बापाचं मन
घरामधला कर्ता बाप,
जेव्हा येतो बाहेरून |
पाळलेली मांजर सुद्धा,
आनंदाने जाते शहारून |
म्याव म्याव करत बिचारी,
फिरते साऱ्या घराला |
पण ते प्रेम कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |
मालकाला बघून कुत्रा,
झेपावून घेतो ओढ |
साखळी दाटे मानेला,
कमी होत नाही वेड |
शेपटीचा गोंडा घोळून,
घुटमळते ते दाराला |
पण ती ओढ कळत नाही,
दूर बघून मालकाला,
हंबरते गोठ्यात गाय |
वळवळ करते जागीच,
तान्ह्या वासराची माय |
वासराच्या आधी चाटे,
ती मालकाच्या ऊराला |
पण ती माया कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |
बांधा वरचा बैल सुद्धा,
हाक ऐकुन परत वळतो |
रागाची हाक असुनही,
गप गुमान रानात पाळतो |
आपुलकीचा राग सुद्धा,
कळतो मुक्या ढोराला |
पण तो राग कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |
जीव लावला जनावराला,
लेकरावानी वागत आली |
पोटची लेकर मात्र कशी,
परक्यावानी जगत आली |
बाप लेकाचा सुर कधीच,
जुळला नाही सुराला |
जीव लावनं कळल नाही,
पोटच्या त्या पोराला |
बाप असतो जरा जरा,
नारळाच्या फळा वानी,
बाहेरून कठोर भासे,
आतमध्ये गोड पाणी |
पावसाचं महत्व सुद्धा,
कळेना झालय मोराला,
तसाच बाप कळत नाही,
जिवंत पणी पोराला |


No comments:
Post a Comment